Coronavirus Lockdown : ‘मास्क’ न घालता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर FIR, राज्यातील पहिली घटना पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये सरकारी कार्यालयातीतल कर्मचाऱ्यांवर आणि नागरिकांवर मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. तसे आदेश सरकारने बुधवारी (दि.8) काढले आहेत. मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या 7 व्यक्तींवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मुंबई नंतर पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुणे आणि मुंबईत रस्त्यावर फिरताना, सार्वजनिक ठिकाणी, हॉस्पीटल, कार्यालय, बाजारपेठ, खासगी किंवा शासकीय वाहनाने वाहतूक किंवा प्रवास करताना, कामाच्या ठिकाणी किंवा त्याच्या कार्यालयात मास्क वारणे सक्तीचे केले आहे.

मास्क वापण्यास सक्तीचे केले असतानाही चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुदळवाडी भागात 7 जण मास्क न घालता अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावरून जाताना आढळून आले. या व्यक्तीवर भादंवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारची कारवाई येत्या काळात सुरु राहणार असून नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवून रस्त्यावरून चालावे. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन चिखली पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.