पिंपरीत विनाकारण शहरात फिरणाऱ्या 117 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  पिंपरी चिंचवड शहरात विनाकारण घराबाहेर चालत, वाहनातून फिरणा-या 117 जणांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी सुरु असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. त्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल. घरातील केवळ एका व्यक्तीने घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात. हे करत असताना देखील नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रशासनाला एकाच ठिकाणी गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जात आहे.

केक घेऊन जात असताना पोलिसांशी हुज्जत घालणा-या दोन तरुणींवर वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस विनंती करीत आहेत. हातात काठी घेऊन, दमबाजी करूनही नागरिकांना समजावत आहेत. याचा फरक न पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई आणि शेवटी गुन्हे देखील दाखल करत आहेत. तरीही नागरिक रस्त्यावर येताना दिसत आहेत. पोलिसांनी देखील अशा नागरिकांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात 01, चिंचवड 03, निगडी 03, देहूरोड 05, तळेगाव दाभाडे 14, तळेगाव एमआयडीसी 05, चिखली 04, सांगवी 05, वाकड 48, हिंजवडी 04, भोसरी 05, एमआयडीसी भोसरी 03, दिघी 07, चाकण 05, आळंदी 05 असे एकूण 117 गुन्हे दाखल झाले आहेत.