पिंपरी : रावण गँगची पोरं असल्याचं सांगत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, उकळली 3.5 लाखाची खंडणी

पिंपरी : आम्ही सोन्या काळभोर, रावण गँगची पोर आहोत़ तुला पळवून नेऊन तुझ्या आईबापाकडून खंडणी मागू अशी धमकी देऊन एका १४ वर्षाच्या मुलीकडून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा ऐवज उकळला. तसेच तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहुरोड पोलिसांनी यातील तिघांपैकी दोघांना अटक केली आहे.

प्रणव अनिल महाडिक (वय १८, रा. गुरु गणेश शाळेसमोर, प्राधिकरण़ निगडी) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २१, रा. गंगानगर, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार सपाटे हा फरार आहे. हा प्रकार आकुर्डीतील हॅमर कॅफे, आकुर्डी गर्ल व बॉईज हॉस्टेल व रावेत येथील डी वाय पाटील रोडवर २७ जानेवारी ते २८ मार्च दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन १४ वर्षाच्या एका मुलीला आम्ही सोन्या काळभोर, रावण गँगची पोर आहोत. आम्ही तुला पळवून नेऊन तुझ्या आई बापाकडून खंडणी मागू अशी धमकी देऊन भिती दाखविली. तिला दमदाटी करुन तुझे किडनॅप करु नये असे वाटत असेल तर तु पैसे दे अशी मागणी केली. त्यांच्या भितीने या १४ वर्षाच्या मुलीने घरातील ४५ हजार रुपये रोख व २ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे ७३ ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने असा ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज वेळोवेळी या तिघांना खंडणी स्वरुपात नेऊन दिला.

तसेच प्रणव महाडिक याने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. घरातील पैसे, दागिने गायब झाल्याचे या मुलीच्या आईच्या लक्षात आले. तिने मुलीकडे चौकशी केल्यावर तिने घडलेला हा प्रकार सांगितले. त्यानंतर आईने देहुरोड पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.