Pimpri : रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री ! आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर हे इंजेक्शन अत्यावश्यक आहे़ अत्यवस्थ व गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे या इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एका बाजूला इंजेक्शनसाठी दुकानांसमोर रांगा वाढत असून दुसरीकडे काही जण त्याचा काळाबाजार करीत आहेत. अशा काळाबाजार करणार्‍या ३ रुग्णालयांना पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयाबाहेर अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीत विकत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल यांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी़ वाय. पाटील हॉस्पिटल अधिष्ठाता तथा वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता असल्याने सध्या सर्वत्र या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन ही मोठी हॉस्पिटलही जादा किंमतीत हे इंजेक्शन विकत असल्याचे आढळून आले आहे. येत्या ४८ तासात खुलासा करण्याचा आदेश या नोटीसीमध्ये हॉस्पिटलला देण्यात आला आहे.