पिंपरी : गुंडा विरोधी पथकाला सट्टेबाजांची धक्काबुक्की; आयपीएलवर बेटिंग घेणार्‍या तिघांना अटक

पिंपरी : आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुंडाविरोधी पथकाला सट्टेबाजांनी धक्काबुक्की केली असून त्यात पोलीस कर्मचार्‍याला मुका मार लागला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

श्रीपाद मोहन यादव (वय २२, रा. सुंदर आनंदी निवास, पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय ३५, रा. सेक्टर २७, निगडी) आणि नितीश रामदास काळे (वय २१, रा. कोमल निवास, पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार किशोर रेहाल ऊर्फ किशोरभाई (रा. चेंबूर) या मुख्य सुत्रधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आकुर्डीतील पंचातारानगर येथे शुक्रवारी रात्री करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. किशोरभाई याच्या मदतीने तिघे जण आय पी एल मध्ये चालू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर लोटस ऑनलाईन सट्टा खेळत होते. याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पंचतारानगर येथे छापा घातला. पोलीस आल्याचे दिसताच या तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना धक्का बुक्की केली. त्यावेळी झटापट झाल्याने फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना मुका मार बसला. जुगार कायद्याबरोबरच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.