Pimpri News : बदनामी करण्याच्या धमकीमुळे तरुणाची आत्महत्या, तरुणीला अटक

पिंपरी : तरुणाबरोबर प्रेम संबंध निर्माण करुन पैशाची मागणी करणार्‍या व ते न दिल्यास समाजात बदनामी करण्याची धमकी प्रेमिकेने दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी खेड तालुक्यातील कोयाळी बापदेव वस्ती येथील एका तरुणीला अटक केली आहे.

आकाश दादाभाऊ पोकळे (वय २०, रा. कोयाळी, बापदेव वस्ती, ता़ खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या बहिणीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश याच्या मोबाईलवर संगिता हिने फेसबुक मॅसेजरवर चॅटींग करुन गोड गोड बोलून त्याला भुरळ पाडली. त्याच्या सोबत प्रेमसंबंध निर्माण केले. आकाश याला आपल्याबरोबर शारीरीक संबंध निर्माण करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्याकडे पैश्यांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्याने नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे आकाशला मानसिक त्रास झाला. त्यातून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मोबाईलवरील चॅटींग तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला अटक केली आहे.