Pimpri : तारीणी स्टील प्रा.लि. कंपनीत कामगाराचा मृत्यू ! कंपनी मालक, सुपरवायझरवर FIR

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीत काम करत असताना कामगाराच्या अंगावर लोखंडी तारेचे क्वाईल बंडल पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात कंपनी मालक आणि सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2019 मध्ये रात्री दीडच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथील तारीणी स्टील प्रा.लि. कंपनीत घडली होती. याप्रकरणी सोमवारी (दि.12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्यूंजय लंबोदर बेहरा (वय-40 रा. वडगाव रोड, चऱ्होली खुर्द, ता. खेड, मुळ रा. सोलपाटा हलपाटा राज्य ओडीसा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनी मालक अभिषेक अगरवाल (रा. कॅम्प, पुणे), कंपनी सुपरवायझर किशोर देवीदास कुलकर्णी (रा. वडगांव रोड, साई पार्क, चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय ज्ञानेश्वर टोके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मयत कामगार बेहरा हे कंपनीत काम करत होते. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान मशीन वरील क्वाईल बंडल संपल्याने त्याने क्वाईल स्टँन्डवर क्वाईल लावण्यासाठी क्वाईल स्टँड आडवे केले. लोखंडी तारेचे क्वाईल बंडल तारेने बांधून ते क्रेनच्या हुकाला अडकवले. क्रेनने बंडल उचलत असताना तार तुटल्याने लोखंडी तारेचे बंडल बेहरा यांच्या अंगावर पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान बेहरा यांचा 27 ऑगस्ट 2019 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास मृत्यू झाला.

आळंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंदवण्यात आले होते. मात्र चौकशीत कंपनी मालक अभिषेक अगरवाल, कंपनी सुपरवायझर किशोर कुलकर्णी यांनी कंपनीत कामगारांना संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच लोखंडी तारेचे बंडल उचलताना कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोघांवर सोमवारी (दि.12) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.