पिंपरी : 38 लाखांच्या गुटख्यासह टेम्पो, इनोव्हा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चार जणांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 38 लाखांच्या गुटख्यासह एक टेम्पो व एक इनोव्हा कार अशा एकूण 56 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (दि. 13) ताथवडे येथे ही कारवाई करण्यात आली.

जनार्दन शंभु भारती (वय 28, रा. चकाला, अंधेरी, मुंबई), सुनिलकुमार गौरीशंकर तिवारी (वय 37, रा. गणेश गल्ली झोपडपट्टी , ठाणे वेस्ट), जियारुलखान रशीद खान समा (वय 32, रा. शिफ्टींग चाळ, मिरा रोड, ठाणे) आणि धरमशंकर दुर्गाचरण गुप्ता (वय 36, रा. तिलकनगर, बोरीवली-वेस्ट मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे यांना गुटख्याच्या अवैध वाहतुकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार ताथवडे येथील हॉटेल स्टे इन समोर सापळा लावून आयशर टेम्पो (एमएच-02-ईआर-3893) व एक इनोव्हा कारची (एमएच-47के-2736)तपासणी केली असता टेम्पोमध्ये चालकसह तिघेजण मिळून आले. प्रतिबंधित गोवा गुटख्याचे 29 पोती तसेच इनोव्हामध्ये गोवा गुटख्याचे 01 पोते असा एकूण 38 लाख, दोन हजार 500 रूपयांचा प्रतिबंधित गोवा गुटखा मिळून आला.

पोलिसांनी टेम्पो व इनोव्हामधील मुद्देमालसह एकूण 56 लाख 2 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला. अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हि कामगिरी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक निरीक्षक हरीश माने, तपासी पथकातील शाम बाबा आणि त्यांच्या पथकाने केली.