Pimpri : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघाताचा बहाणा करुन अभिनेत्याला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून मुंबईला जाणार्‍या अभिनेत्याला तुमच्यामुळे अपघात झाल्याचे बहाणा करुन लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर सोमाटणे एक्झीटच्या अलीकडे ८ मे रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी अंधेरीत राहणार्‍या ३२ वर्षाच्या मराठी अभिनेत्याने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ‘मुलगी झाली हो’ फेम हा अभिनेता पुण्याहून एकटाच मुंबईला आपल्या कारमधुन जात होता. त्यावेळी एक पांढर्‍या रंगाची स्कॉपिओ पाठीमागून आली. त्यातील चालकाने त्यांना सोमाटणे एक्झीटजवळ कार बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर कारमधून उतरुन फिर्यादीला म्हटले की, तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. एका इसमाला दुखापत झाली आहे.

या अपघाताची कायदेशीर पोलिसांकडें तक्रार करायची नसेल तर तू १ लाख २५ हजार रुपये दे़ नाही तर तुझ्यावर पोलीस केस होईल, अशी भिती दाखवून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी करून सोमाटणे फाटा येथील एटीएम जवळ नेले. एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडून ते पैसे घेऊन तो पळून गेला. या घटनेनंतर या अभिनेत्याने शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली असून तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.