पिंपरी : ATM चोरीच्या गुन्ह्यातील ‘मास्टरमाईंड’ गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड येथील थरमॅक्स चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून मशीन चोरून नेणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. मेहरबानसिंग तारासिंग डांगी (25, रा. महानगर पालिका व्यायामशाळेजवळ, राजनगर, ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व नितीन बहिरट यांना माहीती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एमटीएम चोरीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मेहरबानसिंग तारासिंग डांगी हा असून, तो देहूरोड येथील सेन्ट्रल चौकात येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी डांगी सेन्ट्रल चौकात आल्यानंतर त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि तो पळून जाऊ लागला.

मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला डांगी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्यासमोर त्याची हुशारी जास्त काळ चालली नाही. त्याने त्याचे सांथिदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांच्या सोबत मिळून चिंचवड येथे एटीएम चोरून नेल्याचा गुन्हा कबूल केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितिन बहिरट, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.