पिंपरी : रिक्षावर कारवाई करणार्‍या महिला पोलिसांचा भररस्त्यावर विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राँग साईडने आलेल्या रिक्षाचालकावर कारवाई करत असताना आलेल्या एकाने रस्त्यात महिला पोलिसांच्या तोंडात मारुन त्यांचा विययभंग करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोरोना संसर्गाचा धोका पत्करुन रस्त्यावर बंदोबस्त करणार्‍यांचा गौरव समाजाकडून केला जात असतानाच भर रस्त्यावर महिला पोलिसांवर हात उगारण्याचा हा धक्कादायक प्रकार पिंपरी वाहतूक विभागासमोर रस्त्यावर घडला.
प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय ५१, रा. जयगणेश वरदहस्त, कामगार भवनासमोर, पिंपरी) आणि रिक्षाचालक अहमद मौल शेख (वय ३३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी महिला या पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बंदोबस्तावर होत्या. यावेळी एक रिक्षा राँग साईडने आला. तेव्हा त्यांनी रिक्षा थांबवून चालकाला कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याने स्वत:चे नावही न सांगता कागदपत्रे दाखविली नाहीत. तेव्हा कारवाई करण्यासाठी त्या चालकाला घेऊन पिंपरी वाहतूक कार्यालयात गेल्या. तेथे कारवाई करीत असताना प्रल्हाद कांबळे तेथे आला. त्याने तुम्ही हे कशासाठी करता हे मला चांगले माहिती आहे.

पोलीस लाचार आहेत. त्याने रिक्षाचालकाला म्हटले की, तु जा रे इथून ही काय करते मी पाहतो, असे म्हणून त्याने रिक्षाचालकाला बाहेर काढले व पळवून लावले. त्या रिक्षाचालकाला पकडण्यासाठी धावल्यावर कांबळे याने फिर्यादी महिलेला हाथ धरुन ओढले. त्यांची गचांडी पकडून त्यांना भर रस्त्यावर दोन थोबाडीत मारल्या. त्यांचा विनयभंग केला. पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.