पिंपरी : मोबाइल शॉपीत चोरी करणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाइल शॉपी फोडून मोबाइलची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युनिट 5 च्या पोलिसांनी तळेगाव दाभाडे आणि देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहेत.

जनककुमार विक्रम साही (वय 38 रा. डायमंड बिल्डींग, सेक्टर 16, राजे शिवाजीनगर, चिखली, मुळ रा. ओमकाना, कडनाली, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. युनिट 5 चे पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे व दत्तात्रय बनसुडे यांना एक इसम देहूरोड येथील सेंट्रल चौकात मोबाइल विक्री करण्यासाठी दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी जनककुमार साही याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्याने एका मित्राच्या मदतीने जानेवारी महिन्यामध्ये सोमाटणे फाटा येथील एक मोबाइल शॉपी फोडून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1 डेल कंपनीचा लॅपटॉप, 10 मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 2 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या कारवाईत पोलीस कर्मचारी फारुख मुल्ला आणि संदीप ठाकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलासह अब्दुल शब्बीर अब्दुल कादर शेख (वय 20 रा. भारतनगर बांद्रा ईस्ट मुंबई मुळ रा. प्रगती कॉलनी बी, विकासनगर, देहुरोड) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी लेखा फार्म येथे एका व्यक्तीला अडवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून आरोपींना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुकत, गुन्हे सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्रीधर जाधव, गुन्हे शाखा युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, मयुर वाडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे यांनी केली आहे.