विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ताथवडे येथील इंदिरा कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 18 वर्षीय पीडित विद्यार्थिनीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरद अशोक पवार  (30), प्रवीण शिवाजी पवार (30, दोघेही रा. जीवननगर, ताथवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी एम एच 14 / एफ एस 3522 या मोटारीतून आले. त्यांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी तरुणीचा इंदिरा कॉलेजच्या प्रवेशद्वारावर व आतमध्ये जाऊन विनयभंग केला. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला अश्‍लील शब्दात बोलून मनास लज्जा निर्माण केली. आरोपींना रोखण्यासाठी आलेल्या फिर्यादी तरुणीच्या मित्राला देखील शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. पोलीस उपनिरीक्षक अंगज याबाबत अधिक तपास करीत आहेत.