पिंपरी : महाकाली गँगच्या म्होरक्यासह दोन गुंड तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – देहूरोड परिसरातील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मनोज उर्फ डिंग-या फुलचंद ढकोलिया (35, रा. रावेत), जोएल भास्कर पिलानी (20, रा. साईनगर, मामुर्डी) अशी ताडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज हा देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर देहूरोड, पिंपरी, चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकण्याचा प्रयत्न, विनयभंग, शासकीय नोकरावर हल्ला करणे, दंगल करून वाहनांची तोडफोड करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत निर्माण झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जोएल याच्यावर दरोडा टाकणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, जाळपोळ, दंगल करून वाहनांची तोडफोड करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे असे गुन्हे दाखल आहेत. आरोपीची परिसरात दहशत निर्माण होऊ लागल्याने याला देखील दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. देहूरोड पोलिसांनी मागील एका आठवड्यात चार गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रमोद सात्रस, अनिल जगताप, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

Visit :  Policenama.com