पिंपरी : केबल टाकताना तोल जाऊन पडून कामगाराचा मृत्यु; सुपरवायझरसह दोघांविरुद्ध FIR

पिंपरी : एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर केबल टाकताना तिसर्‍या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यु झाला. रुपेश मोहन देवकर (वय २९, रा. खराळवाडी, भारतमाता नगर) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना आकुर्डीमधील बजाज कॉलनीत शनिवारी दुपारी चार वाजता घडली.

निगडी पोलिसांनी गॅझॉन कंपनीचे सुपरवायझर आशिष जैन व ठेकेदार नंदलाल शिवभगवान पारीख (रा. बजाज कॉलनी, आकुर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शुभम बाळासाहेब गलांडे (वय २६, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र वसंत बाबाजी भोर (वय ३१, रा. चिखली) व रुपेश मोहन देवकर हे बजाज कॉलनीत नंदलाल पारीख यांच्या बिल्डिंगवर केबल फिरवण्याचे काम करत होते. एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर केबल टाकताना त्यांना सुरक्षिततेसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे साहित्य त्याना दिले नाही. एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर केबल टाकताना इमारतीच्या तिसर्‍या मजल्याचे टेरेसवरुन तोल जाऊन रुपेश खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल आशिष जैन आणि नंदलाल पारीख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.