पिंपरी : रोबोट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यु

पिंपरी : जॉबला स्पॉट वेल्डिंग करण्यासाठी नादुरुस्त रोबोट रोबोटीक लाईनवर पाठविल्याने तो कामगाराच्या डोक्यात पडून त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला. चाकणजवळील मेदनकरवाडी येथील टाटा अ‍ॅटोमोटीव्ह अँड अ‍ॅसेंब्लिस लि या कंपनीत बुधवारी सकाळी ही घटना घडली.

उमेश रमेश ढाके (वय ४४, रा. दत्तनगर, आळंदी, मुळगाव भुसावळ) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अ‍ॅक्युपायर डायरेक्टर, कंपनीच्या प्लांट मॅनेजर, प्रोडक्शन हेड युवराज बुचडे, असिस्टंट राहुल खैरनार आणि मेंटेनेन्स मॅनेजर रवींद्र कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमेश यांची पत्नी प्रिया ढाके यांनी फिर्याद दिली आहे.

उमेश ढाके हे कंपनीत टाटा अ‍ॅटोमोटिव्ह अँड अ‍ॅसेंब्लिस कंपनीत कामाला होते़ बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीला गेले होते. यावेळी कंपनीतील अधिकृत रोबोट (यंत्रमानव) चा सेंन्सर खराब होता़ हे माहित असतानाही कंपनीतील अधिकार्‍यांनी त्या नादुरुस्त अवस्थेत जॉबला स्पॉट वेल्डिंग करण्यास फिक्चरवर पाठवून दिले. तेथे उमेश ढाके हे काम करीत होते. सकाळी सव्वा आठ वाजता अचानक रोबोटचे नियंत्रण गेले व हा रोबोट उमेश ढाके यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला, मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी पिंपरीतील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले. कंपनीतील कामगारांचे सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य पुरवले नाही. तसेच सुरक्षेविषयक आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने पोलिसांनी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.