पिंपरी : तब्बल 62 कामगारांचे बनावट कोरोना रिपोर्ट देणार्‍या लॅब मालकासह कामगाराला अटक; ‘या’ कारणामुळं फसवणुकीचा प्रकार उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   एका कंं पनीतील तब्बल ६२ कामगाराचे कोरोना आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुने घेऊन तपासणी न करता बनावट रिपोर्ट तयार करुन देणार्‍या लॅब मालकासह कामगाराला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

बिरुदेव नानासाहेब वाघमोडे (वय २२, रा. बोल्हाईचा मळा कॉलनी, जाधववाडी, चिखली) आणि समर्थ पॅथ लॅबचा मालक बळीराम बापू लोंढे (वय २४, रा. शरदनगर कॉलनी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी सुजित विजय वायकर (वय ३८, रा़ चर्‍होली) यांनी फिर्याद दिली आहे. बिरुदेव व बळीराम हे चिखलीतील एका लॅबमध्ये कामगार आहेत. फिर्यादी यांनी त्यांना त्यांच्या कंपनीतील ६२ कामगारांची कोरोना टेस्ट करायला सांगितले होते़ त्यांनी नमुने घेतले. मात्र, लॅबमध्ये त्याची तपासणी न करता त्यांनी एका डायग्नोस्टिक लॅबच्या नावाचे व डॉक्टरांची डिजिटल सही असलेले आणि बारकोड सिस्टिम व इतर इलेक्ट्रॉनिक साधने वापरुन दोघांनी पूर्वीच्या रिपोर्टमध्ये एडिटिंग व छेडछाड करुन बनावट रिपोर्ट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून फिर्यादींच्या कामगारांचे कोरोना आर टी पी सी आर चाचणीचे रिपोर्ट तयार करुन कंपनीला दिले. कामगार बिरुदेव व समर्थ पॅथ लॅबचा मालक बळीराम लोंढे याने फसवणूक केली.

असा उघडकीस आला फसवणूकीचा प्रकार

कंपनीच्या अधिकार्‍यांनी कामगारांचे रिपोर्ट मिळाल्यावर त्यांनी त्यावरील क्युआर कोड स्कॅन करण्यास सुरुवात केली. मात्र, कोणाचाही क्युआर कोड स्कॅन केला तरी एकाचाच रिपोर्ट तोही त्यांच्या कंपनीशी संबंधित नसल्याचा दिसत असल्याने हा फसवणूकीचा प्रकार उघड झाला.

दोघांनी मिळून नमुने घेतले असले तरी त्याची तपासणी न करता सरसकट मनाला येईल, त्याप्रमाणे कोणाला निगेटिव्ह तर कोणाला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले होते. त्यांनी आणखी काही जणांची अशा प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.