पिंपरी चिंचवड शिवसेना गटनेते राहुल कलाटे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग लोकप्रतिनीधींना होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल कलाटे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सोमवारी (दि.6) सायंकाळी पॉझिटिव्ह आला. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे.

लॉकडाऊन नंतर अनलॉकमध्ये पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. राहुल कलाटे हे कोरोना काळात अनेक लोकांना मदत करत होते. त्यावेळी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल कलाटे हे महापालिकेत बैठकांना हजर रहात होते. तसेच त्यांचा महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांशी संबंध येत होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 581 नवे कोरोनाबाधीत रुग्ण सापडले असून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4861 वर पोहचली आहे.