‘पिंजरा तोड’ ग्रुपच्या महिला निघाल्या अँटी CAA प्रोटेस्ट आणि दंगलीच्या ‘मास्टरमाइंड’ !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जाफराबादमधील दंगलीच्या प्रकरणात ‘पिंजरा तोड’ च्या सदस्या नताशाला यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत अटक केली आहे. स्पेशल सेल नताशाची चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले आहे की नताशाला जाफराबादमधील दंगली घडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

सीएएविरोधी निषेध करण्यासाठी महिलांना भडकवणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने असे आंदोलन सुरू करण्यात पिंजरा तोड ग्रुपने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, नताशा आणि देवांगनाची पीएफआयमधील अनेक लोकांसह दंगलीत सामील लोकांबरोबर अनेकदा भेटी झाल्या, ज्यात नताशा आणि देवांगना यांच्यासह इतर पिंजरा तोडच्या लोकांना भावना भडकवण्यासाठी सांगण्यात आले.

जेव्हा सीएएविरोधी निषेध दीर्घकाळापर्यंत वाढला आणि त्यांचे हेतू पूर्ण झाले नाहीत, तेव्हा एका विशेष बैठकीत नताशा आणि देवांगनासह इतर पिंजरा तोडच्या सदस्यांना नवीन कार्यभार सोपविण्यात आला, तेव्हा नताशाला जाफराबाद दंगलीचा कट रचण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचप्रमाणे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात पिंजरा तोडच्या मुलींना अशाच जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यांचे काम परिसरातील महिलांना भडकावण्याव्यतिरिक्त पोलिस प्रशासनाबद्दल भीती निर्माण करणे व त्यांच्यावरील विश्वास कमी करणे हा होता त्यासाठी अफवा पसरवण्यात आल्या आणि यामुळेच दंगलीत पोलीस अधिकारी आणि टीमवर हल्ला करण्यात आला.

पिंजरा तोड ग्रुपचे काम दंगलीसाठी स्थानिक लॉजिस्टिक सप्लाय करणाऱ्यांची भेट महिलांशी करून देणे हे देखील होते. या संपूर्ण खेळात प्रचंड निधी जमा झाला होता. दिल्लीतील दंगली आणि सीएएविरोधी निषेध आणि पिंजरा तोडसाठी होणाऱ्या निधीचे स्रोत हे समान आहेत. पोलिस आता सभांच्या तपशिलांविषयी आणि सभांमध्ये उपस्थित असलेल्या लोकांचा तपशील गोळा करीत आहेत. चौकशीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, या पिंजरा तोड ग्रुपमध्ये केवळ मुलीच नाही तर मुलं देखील सहभागी आहेत, ज्यांची दिल्ली दंगलीत आणि संपूर्ण षडयंत्रात भूमिका होती. त्यांच्याविषयीची माहितीही पोलिस गोळा करत आहेत. दरियागंजमधील पोलिसांवर दगडफेक व जाळपोळप्रकरणी गुन्हे शाखेने नताशा आणि देवांगना यांना अटक केली आहे.