Pune : शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून 9 जण किरकोळ जखमी, सुमारे 40 घरांचं नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याला पाणीपुरवठा करणारी 18 इंची जलवाहीनी पर्वती जवळील जनता वसाहातीमध्ये फुटल्याने पूर आला. यात घरात पाणी शिरल्याने येथील रहिवाशी 50 ते 60 फुट वाहत गेले होते. यात 9 जण जखमी झाले आहेत. दाबाने पाणी घुसल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

महेश मोरे, रविंद्र कोंढाळकर, सुनिताबाई, पियुष जाधव, अक्षय सोलकर अशी जखमीची नावे आहेत. जखमीना ससून व भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
जनता वसाहातीमधील गल्ली क्रमांक 29 मध्ये ही घटना घडली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या टाक्या पर्वती टेकडीवर बांधण्यात आल्या आहेत. त्याला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून पुरवठा होतो. त्या टाक्या अगोदर भरून त्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो.

डोंगरउतारावरून पाणी येत असल्याने पाण्याला जास्त दाब असतो. पाणी दाबाने उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोघांना हाडामध्ये फॅक्चर झाले आहे. रात्रीची वेळ असल्याने लोकांना काही समजले नाही. लोक घराच्या बाहेर आल्यानंतर त्यातील अनेकजण पााण्याबरोबर वाहत होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले काहीजण जखमी झाले. जनता वसाहातीमध्ये अनेक गल्ल्या आहेत. गल्ल्यामध्ये दाबाने पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान गल्ली नं. 29 मधील घरांचे झाले आहे. येथील घरात वेगाने पाणी घुसल्याने अनेकजण पाण्याबरोबर वाहत गेल्याने आदळून जखमी झाले आहेत. अग्नीशमक दल, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.