पिस्तुल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूरात अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुलचा पुरवठा करणारा पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याला रविवारी पहाटे कोल्हापूरात अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी हॉटेल स्कायलाक येथे पहाटे छापा घालून मनीष नागोरीला जेरबंद केले. कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कलम १४२ नुसार मनीष नागोरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी ही कारवाई केली आहे.

मनीष नागोरी हा पॅरोलवर कारागृहातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चंदगड येथून दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४ पिस्तुले व काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यांना मनीष नागोरी यानेच पिस्तुले पुरविली होती, असे तपासात पुढे आले. त्यानंतर पोलीस मनीष नागोरी याचा शोध घेत होते.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. या हत्येसाठी त्यानेच पिस्तुल पुरविल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते.

पिस्तुल तस्कर मनीष नागोरी हा मुळचा शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे राहणारा आहे. त्याच्या वडिलांचा कापडाचा छोटा व्यवसाय आहे. मनीषने इचलकंरजीला मोबाईल विक्रीचे दुकान थाटले. पण झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तो अवैध धंदे करु लागला. त्यातून त्याचा उत्तर प्रदेश, बिहारमधील काही जणांशी संपर्क झाला. त्याला खाकी वर्दीतील काही जणांचे पाठबळ मिळाल्याने त्याच्या या धंद्याचा व्याप तीन राज्यात पसरला.