तुमच्यामुळे 10 लाख रोजगार गमवावे लागले, पियुष गोयल यांचा ‘अ‍ॅमेझॉन’ वर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी पुन्हा एकदा अ‍ॅमेझॉनवर निशाणा साधला आहे. गेल्या काही वर्षात केवळ पुरवठ्याच्या बाजुनेच अ‍ॅमेझॉनने नोकऱ्या उपलब्ध केल्या, मात्र त्याबदल्यात किरकोळ व्यापार आणि इतर क्षेत्रातील कित्येक लाख लोक बेरोजगार झाले आहेत. त्यात अ‍ॅमेझॉनने १० लाख नव्या नोकऱ्या देण्याची घोषणा केली. मात्र कंपनीमुळे बेरोजगार झालेल्यांची संख्या अधिक असल्याचा आरोप पियुष गोयल गोयल यांनी केला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गोयल सध्या दावोसला गेले आहेत.

यावेळी एका मुलाखतीत त्यांनी म्हंटले कि, ई कॉमर्स कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नियमांच्या अधीन राहून भारतात व्यवसाय करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतात येत्या पाच वर्षांच्या कालावधीत १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतर अ‍ॅमेझॉनने भारतात येत्या ५ वर्षांत १० लाख नवे रोजगार निर्माण केले जातील, असे म्हटलं आहे. मात्र अ‍ॅमेझॉनला येथील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तोटा होत असल्याने ते १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहेत, त्यामुळे ते आपल्या देशावर कोणत्याही प्रकारे उपकार करत नाहीत, असे म्हणत पियुष गोयल यांनी अ‍ॅमेझॉनला लक्ष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद कॉर्पोरेट क्षेत्रात उमटले होते. त्यानंतर गोयल यांनी नरमाईची भूमिका घेत विदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यांनी येथील कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती.

मात्र आता पुन्हा गोयल यांनी अ‍ॅमेझॉनच्या रोजगारनिर्मितीविषयक केलेल्या घोषणबदल अ‍ॅमेझॉनला लक्ष्य केले आहे. अ‍ॅमेझॉनतर्फे भारतात येत्या ५ वर्षांत १० लाख नवे रोजगार निर्माण करणार, असे जाहीर केले. यावर गोयल म्हणतात की, अ‍ॅमेझॉनच्या लाखो नव्या नोकऱ्यांच्या तुलनेत मागील काही वर्षात बेरोजगार अधिक झाले आहेत. सरकार म्हणून आम्ही पुरवठा आणि किरकोळ व्यापार यावर लक्ष केंद्रीत करतो. ई – कॉमर्स कंपन्यांनी अनेक पुरवठादारांना जोडून घेतले. त्यांना व्यावसायिक संधी मिळाल्याबद्दल सरकारला आनंदच आहे. मात्र यामुळे किरकोळ व्यापारातील जवळपास १० लाख कामगार बेरोजगार झाले. म्हणजे एकीकडे सात लाख नव्या नोकऱ्या निर्माण करताना १० लाख रोजगार गमावणे हे देशाला परवडणारे नाही, असे गोयल यांनी म्हटलं आहे. त्यांनी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ड यांना नियमानुसार भारतात व्यवसाय करण्याचे आवाहन केले.

फेसबुक पेज लाईक करा –