‘Covid-19 वरून राजकारण करू नका, कोरोनाविरोधी लढयात PM मोदी दिवसातील 18-19 तास काम करतायत’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. बेडची, ऑक्सिजनची, रेमडेसिवीरची कमतरता यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, केंद्राकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदतीसाठी दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप होत आहे. या सर्व घडामोंडींवर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये स्पष्ट मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत दिवस रात्र काम करत आहे.

कोणत्याही राज्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नाही. त्यामुळे यावरून कोणीही राजकारण करू नये असे गोयल यांनी म्हंटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावर होते. ते तेथून परतल्यानंतरहि दिवसातील १८ ते १९ तास काम करत असून देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचा दावाही गोयल यांनी केला आहे.

पियुष गोयल यांनी या मुलाखतीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असलेल्या भेदभावाच्या आरोपावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचं पाहून मला फार वाईट वाटलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार कोणताही भेदभाव न करता लढत आहे. या विषयाला जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही लोकं राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून मला फार वाईट वाटतं असं गोयल यांनी म्हटलं आहे.

१२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. तेथील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये सहा हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवला जाणार असून सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, असंही गोयल यांनी सांगितले.

केंद्र सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे राज्य सरकारांना मदत करण्यासाठी सतत काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारानंतर दिल्लीत परतल्यावर त्यांनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. १८-१९ तास काम ते काम करतायत. जे नेते नीट काम करत नाही त्यांना काम सादर करण्यासंदर्भातील चिंता करावी लागतेय,” असं गोयल म्हणाले. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत गोयल म्हणाले, यासाठी ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात आहे. शनिवारी भाजपा सरकारकडून काही राज्यांना झुकतं माप दिलं जात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली होती. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केंद्राला पत्र पाठवल्याचं सोनिया यांनी म्हटलं होतं.