युक्रेनमध्ये लष्कराच्या विमानाचा ‘अपघात’, 22 ठार तर 4 बेपत्ता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी युक्रेनमध्ये एक भीषण विमान अपघात झाला. युक्रेनमध्ये लष्कराचे विमान कोसळले. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. तसेच चार लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या क्रॅश झालेल्या विमानामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 28 जण होते. विमान लँडिंग दरम्यान क्रॅश झाल्याचे सांगितले जात आहे. लँडिंगच्या वेळी विमानाला आग लागली आणि विमान आगीच्या ज्वालांनी वेढले गेले. घटनास्थळी उपस्थित कर्मचार्‍यांनी बरीच मेहनत घेत आगीवर नियंत्रण मिळवले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मदत आणि बचाव काम वेगाने केले जात आहे. विमानात अडकलेल्या 24 जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

डॉक्टरांनी 22 जणांना मृत घोषित केले असून दोन लोकांवर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. चार लोक अद्याप बेपत्ता आहेत. हरवलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.