पुणे : वन अधिकारीच फितूर निघाल्याने छापा फसला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

वन्यजीव कायद्या अंतर्गत प्रतिबंधित प्राण्यांना डांबून ठेवल्याची, दुर्मिळ सर्पांच्या विषाची तस्करी आणि दुर्मिळ किटकांचा संग्रह केल्याची तक्रार नागपुरच्या प्रधानमुख्य वनसंरक्षक कार्यालयाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत संबधित प्राणीशास्त्राच्या प्राध्यापकाच्या आलिशान बंगल्यासह प्रतिष्ठीत महाविद्यालयावर छापा घालण्याची जय्यत तयारी नागपुर आणि पुणे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र वन अधिकारीच फितूर निघाल्याने हा छापा फसला.

जाहिरात

छापा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकामधील एक जणाने यापुर्वी जुन्नर वनविभागात काम केले होते. त्याने काल मंगळवार (ता.१२) संबधीत प्राध्यापकांचा भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी जुन्नर शहरातील एका जुन्या सहकाऱ्याकडे केल्याची चर्चा आहे.  संबधित प्राध्यापकाचा क्रमांक मिळविल्यांनंतर हा कर्मचारी फितुर होऊन छाप्याची माहिती अगोदरच प्राध्यापकाला दिल्याची चर्चा आहे. यामुळे मोठ्या जय्यत तयारीने आलेल्या वन अधिकाऱ्यांना हाती भोपळा लागल्याने छापा फसला. छाप्या दरम्यान काहीही हाती लागले नसल्याचे समजते.

पुणे : कमीशनसाठी लुटले कॉसमॉस बँकेचे करोडो रुपये 

दरम्यान संबधित प्राध्यापक ज्या महाविद्यालयात कार्यरत आहे. त्याच्या अखत्यारित प्रयोगशाळेतील एका खोलीला कायम कुलूप असते. या खोलीत जाण्यासाठी प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुखांना देखील मज्जाव असल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे.

हा छापा फसल्या प्रकरणी वनविभाग फितुर झालेल्या अधिकाऱ्याची चौकशी करणार का? अशी चर्चा सध्या वनविभाग आणि महाविद्यालयात आहे. दरम्यान, चाकण मध्ये काही दिवसांपुर्वी सापाच्या विषाची तस्करी केल्या प्रकरणी फ्लॅटवर छापा घालुन विषारी साप ताब्यात घेतल्याची घटना घडली होती. यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात सर्प विषाच्या तस्करीचे व्हाईट कॉलर रॅकेट असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु आहे.