हिरो सायकलची चीनविरूध्द ‘हिरो’गिरी, 900 कोटींचा करार केला रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत 20 भारतीयांना हौतात्म्य आले होते. त्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सरकारसह सर्वच भारतीयांनी चीनची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबतचा भविष्यातील 900 कोटींचा करार रद्द केला आहे.

कोरोना विरोधात लढण्यासाठी हिरो सायकल कंपनीने केंद्र सरकारला 100 कोटी रुपयांची मदत दिली होती. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे हिरो सायकल कंपनीने चीनवर बहिषाकर टाकत करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल 900 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार होता.

भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी मोहिम राबवली आहे. हिरो सायकलने चीनसोबतचा आपला सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असून कंपनीने जर्मनीत नवीन प्लांट सुरू करण्याची तयारी केल्याची बोलले जात आहे. लॉकडाउनमध्येही हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यानुसार कंपनीनं आपली क्षमता वाढवली अशून उत्पादनात वाढ केली आहे.