प्लास्टिक बंदीः पुणे मिठाई, फरसाण व दुग्धपदार्थ विक्रेता संघाच्या वतीने व्यापारी वर्गास बंदचे आवाहन

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर 23 जून (शनिवार) पासून कडेकोट अंमलबजावणीमध्ये कारवाईला सुरूवात केली. अनेक शहरामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या  व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र सामान्य व्यापारी अजूनही या कायद्याच्या नियमांबद्दल संभ्रमात आहेत. त्यामुळे शहरात पुणे मिठाई, फरसाण व दुग्ध पदार्थ विक्रेता संघाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना उद्या (सोमवार ) एक दिवसीय लाक्षणीक बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
कोणत्या पॅकिंगवर बंदी आहे आणि कोणत्या पॅकिंगवर बंदी नाही या बाबत सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली प्रेसनोट व व्यापाऱ्यांकडे असलेली माहिती यामध्ये प्रचंड तफावत दिसत असल्याचे मत व्यापारी संघाने व्यक्त केले आहे.
प्रशासनाची  दुटप्पी वागणुक, खाद्यपदार्थाच्या वापरावरील प्लॅस्टिक बाबत आडमुठे धोरण, प्लॅस्टिकला दुसरा पर्याय न देता केलेली नियमांची अंमलबजावणी, मल्टीनॅशनल कंपनीच्या सर्व खाद्यपदार्थांच्या सर्व  प्रकारच्या वेष्टनाबाबत दिलेली सरसकट सुट, लहान व मोठ्या व्यापाऱ्यांची केली जाणारी आर्थिक पिळवणुक, व्यापाऱ्यांना विचारात न घेता त्यांची केलेली अडवणूक अशा विविध मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी एकत्र येत बंदची हाक दिली आहे. शहरात मोठ्याप्रमाणात प्लाॅस्टिक बंदीची कारवाई करण्यात आली. मात्र सरकारी अधिकारी पर्यायी मार्गावर कोणतीच माहिती व्यापाऱ्यांना देत नसल्याचेही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. सुरूवातीला हा बंद एकदिवस लाक्षणीक स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यानंतर देखील सरकारने सकारात्मक पर्यायाच्या बाबतीत विचार नाही केला तर बेमुदत बंद पुकारण्याचा विचार असोसिएशन करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.