मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे बंद करण्यात आलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. लोकल सेवा सुरु झाल्यानंतर मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईत सर्वच स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबई महानगर क्षेत्रातील काही स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या तिकीटांमध्ये भरमसाठ म्हणजे पाच पटीने वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 10 रुपयांऐवजी थेट 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

मध्य रेल्वेने मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात कोरोनाचा धोका असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने 24 फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून 15 जूनपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेशनवर 10 रुपये तिकीट होते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आणि कोविडचं संक्रमण अद्याप कमी झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.