क्विन्सलँडच्या सरकारनं टीम इंडियाला सुनावलं, सांगितलं – ‘नियमांतर्गत खेळा नाहीतर इथं येऊ नका’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासोबत पाच खेळाडूंची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ कडून चौकशी सुरु आहेत. त्यात कडक विलगीकरणाच्या नियमामुळे भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिले होते. त्यावर, ‘जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये,’ अशा शब्दांत क्विन्सलँडच्या आरोग्यमंत्र्यांनी भारतीय संघाला खडेबोल सुनावले आहेत.

विलगीकरणाचे नियम कठोर असल्याने तिसरा आणि चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनीलाच खेळवावे अशी भारताची मागणी असल्याचे वृत्त आस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांनी दिले होते. याबद्दल क्विन्सलँडचे आरोग्यमंत्री रॉस बेट्स यांनी भारतीय संघाला विलगीकरणातून सूट मिळू शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावरती बेट्स म्हणाले, “जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये.” तर क्विन्सलँडचे क्रीडा
मंत्री टिम मेंडर यांनी सुद्धा, “नियम सर्वांसाठी एक असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. जर भारतीय संघाला नियमांतून सूट हवी असेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये,” असे सांगितले होते.

दरम्यान, भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासोबत संघातील अन्य पाच खेळाडूंनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक हॉटेलमध्ये जेवण करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा होती. त्यानंतर ३ जानेवारीला भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती नकारात्मक आल्याची माहिती, एनआयने बीसीसीआयचा हवाला देत दिली आहे.

तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच !

कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढावल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यांनी दिले होते. मात्र तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनला होणार असल्याची ग्वाही सूत्रांनी दिली आहे.