खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी राज्य संघांची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर 24 जानेवारी पासून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच आगामी होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ व कुमार गटासाठीच्या स्की अँड स्नोबोर्ड अजिंक्यपद स्पर्धा यासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्की अँड स्नोबोर्ड संघटना (महाराष्ट्र) यांच्या वतीने 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे. तसेच, यासाठीची पात्रता स्पर्धा व पहिली राज्य स्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 1 फेब्रुवारी 2021 पासून आयोजित करण्यात आली आहे.

स्की अँड स्नोबोर्ड संघटनेचे अध्यक्ष आनंद लाहोटी आणि सचिव साबीर शेख यांनी सांगितले की, वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (पुरुष व महिला), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (पुरुष व महिला), क्रॉसकंट्री पुरुष 15 किमी व महिला 10 किमी, स्प्रिंट 1.5 किमी (पुरुष व महिला) या गटांचा तर, कुमार गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (14,16,18 आणि 21वर्षांखालील मुले व मुली), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (18, 21वर्षांखालील मुले व मुली) या गटांचा समावेश आहे. वरीष्ठ गटात प्रत्येक संघात 5 पुरुष 5 महिलाचा समावेश, तर कुमार गटात 3 मुले व 3 मुलींचा समावेश असतो.

या निवड चाचणी व स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना नावनोंदणी करणे आवश्यक असून जम्मू काश्मीर मधील गुलमर्ग येथे होणाऱ्या या निवड चाचणी शिबिरासाठी नावनोंदणी व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2020 अशी आहे. नावनोंदणीसाठी 9822034902/9890949333 या क्रमांकावर अथवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.