मासिक पाळीच्या जागृतीसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नाट्य सादरीकरण

पोलीसनामा ऑनलाइन – फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया, मुंबई ऑब्स्टिट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी आणि कूपर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत मसिक पाळीबाबत जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मासिक पाळीबाबत माहिती देण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर नाटकाचे सादरीकरण केले.

नाट्य सादरीकरण आणि व्याख्यानातून मासिक पाळीबाबत माहिती उपस्थितांना देण्यात आली. मासिक पाळीबाबत स्वच्छता, गैरसमज, टॅबू आणि सत्य काय हे सांगण्यात आले. यामध्ये कूपर रुग्णालयातील एमबीबीएस आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. कोमल चव्हाण व पीएसएम विभागाच्या डॉ. सोफीया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कोमल चव्हाण म्हणाल्या, मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कूपर रूग्णालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले.

या नाट्याच्या माध्यमातून रूग्णालयातील रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत कशी स्वच्छता ठेवावी आणि याचे महत्त्व सांगण्यात आले. एखाद्या नाट्याच्या माध्यमातून मासिक पाळीचे महत्त्व लोकांना समजवून दिल्यास जनजागृती मोठ्या प्रमाणावर होते.