आताच्या परिस्थितीत रुग्णांना तुमची गरज, OPD सुरु करण्याचे खा. सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य आजार असलेल्या नागरिकांना त्राास सहन करावा लागत आहे. आताच्या परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने ओपीडी सुरु करा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

रूग्णांसाठी डॉक्टरांनी लवकरात लवकर ओपीडी सुरु करावी. ‘आम्ही सर्व सहकार्य करु. मास्क, पीपीई किटस पुरवण्याचा प्रयत्न करु. रुग्णांना तुमची गरज आहे’ असे सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घरगुती हिंसाचार आणि महिला सुरक्षा या विषयांवर संवाद साधला. लॉकडाउनमुळे सध्या अनेक कुटुंबांमध्ये चिंता वाढत चालली आहे. आर्थिक अडचणी आहेत, पगार वेळवर होणार की नाही असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर कसा मार्ग काढता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांविरोधात हिंसाचार सुरुच आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर बेरोजगारी वाढणार आहे. महिलांसमोर आव्हान असणार आहेत. घरगुती हिंसाचारासंबंधी अनेक कायदे आहेत. आता नवीन कायदा करण्याची वेळ नाही. समुपदेशनाच्या मदतीने संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.