पोप फ्रान्सिस यांनी ‘स्वादिष्ट’ जेवण आणि ‘सेक्स’ संदर्भात केलं ‘हे’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ख्रिस्तींचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे एक विधान चर्चेचा विषय झाले आहे. मात्र पोप यांचे हे विधान बुधवारी प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाला दिलेल्या मुलाखतीचा एक भाग आहे. पुस्तकाला दिलेल्या मुलाखतीत पोप यांनी म्हटले आहे की, चांगले शिजवलेले अन्न किंवा सेक्समधून मिळणारे सुख ‘दिव्य’ असते.

पोप यांनी एका इटालियन लेखकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘कोणत्याही प्रकारचा आनंद आपल्याला देवाकडून प्रत्यक्ष स्वरूपात मिळतो. ते कॅथलिक किंवा ख्रिश्चन किंवा इतर काहीही नसते, फक्त ‘दिव्य’ असते.’

पोप यांनी मुलाखतीत म्हटले, ‘चर्चने नेहमीच अमानुष, क्रूर, अश्लील आनंदाचा निषेध केला आहे, पण दुसरीकडे मानवी, साधे आणि नैतिक सुख स्वीकारले आहे.’

पोप म्हणाले की, देवाच्या नजरेत सुख नकारणाऱ्या अशा ईर्ष्यायुक्त नैतिकतेला स्थान नाही. ते म्हणाले की, चर्चमध्ये या गोष्टींचे फार पूर्वी पालन केले जायचे, पण हळूहळू ख्रिश्चनांच्या या संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ लागला.

पोप म्हणाले, ‘खाण्याचा आनंद तुम्हाला निरोगी ठेवतो, त्याचप्रमाणे लैंगिक सुख प्रेमाला आणखी सुंदर बनवते. यामुळे वेगवेगळ्या प्रजातींचे अस्तित्व टिकून राहते.’ ते म्हणाले, ‘विरोधी मतांनी बरेच नुकसान केले आहे, जे अजूनही काही बाबतीत तीव्रपणे जाणवले जाऊ शकते.’

पोप म्हणाले, ‘खाण्याचा आनंद आणि लैंगिक आनंद देवाकडून मिळतो.’ पोप यांनी आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ Babette’s Feast नावाच्या चित्रपटाचाही उल्लेख केला.

पोपची ही मुलाखत पॅट्रिनी यांनी लिहिलेल्या TerraFutura नावाच्या पुस्तकात छापली आहे. पर्यावरण आणि सामाजिकतेबद्दल पोपचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी ही मुलाखत घेण्यात आली होती.