चिनी कंपन्यांनी PM केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का ?

पोलिसनामा ऑनलाईन – भारत-चीन सीमावादावरुन आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर राजीव गांधी फाउंडेशनच्या निधीवरुन भाजपने काही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर आरोप केले होते. यावर आता काँग्रसने देखील पलटवार केला आहे. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली आहे. सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून चहा पित होते. त्यावेळी चीनने पाँईंट 30 आर पोस्ट चुमार, लडाखमध्ये अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. त्यापूर्वीही 2017 मध्ये चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केलीच होती. चीन सीमेवर आपले 20 जवान शहीद होऊनही मोदी सरकार मात्र अजूनही आपल्या भ्रामक विश्वातून बाहेर यायला तयार नाही. चीनने कधीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही किंवा कोणताही प्रदेश ताब्यात घेतला नाही, असा दावा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची दिशाभूल करुन चिनला पोषक अशी भाषा बोलत आहेत. राहुल गांधी यांनी याबाबत वारंवार सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. चीनने भारताच्या चार भागात घुसखोरी करुन जमीन बळकावण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले तेव्हा मोदी सरकार व भाजपाने या विषयांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देशाचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष हे प्रश्न वारंवार उपस्थित करेल. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.