शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! यंदा खरिप हंगामासाठीही पीक विमा योजना राबविणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. यंदा खरीप हंगामातही ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० % राहणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत कृषी विभागाकडून अनेकदा तांत्रिक अडचणी असल्याने पीकविमा मिळत नाही. त्यामुळे या योजनेपासून शेतकरी वंचित राहतात. मात्र यावेळी शेतकऱ्यांची या अडचणीतून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक राहणार आहे. खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळेल.

हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्याने होणारे नुकसान, पिकांच्या हंगामात हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान याचा समावेश करण्यात आला आहे.

पीक विमा योजनेच्या अटी –

भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी योजना लागू असणार आहे. हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्यास वीम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे.