पाकिस्तानात लोकांचे खायचे वांदे पण पंतप्रधान किस्से सांगण्यात मग्न, इम्रान खान यांचा Video व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात एका इंजेक्शनमुळे समोर उभ्या असलेल्या नर्स त्यांना हूर (परी) सारख्या दिसू लागल्या. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ कराचीमधील शौकत खान रुग्णालयाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका भाषणात हे वक्तव्य केले आहे.

इम्रान खान यांनी सांगितले की, 2013 मध्ये निवडणूक प्रचारावेळी अचानक ते खाली कोसळले ज्यामुळे त्यांच्या पाठीवर जखम झाली. यामुळे इम्रान यांना रुग्णालयात भरती करण्यात आले त्यावेळी त्यांना इंजेक्शन देखील देण्यात आले होते. त्या घटनेची आठवण सांगताना इम्रान खान म्हणाले, डॉक्टरांनी मला असे इंजेक्शन दिले की मी माझे दुखणे विसरलो. एवढेच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नर्स मला परी प्रमाणे वाटू लागल्या म्हणून मी डॉक्टरांना पुन्हा एकदा तेच इंजेक्शन देण्यास सांगितले मात्र त्यांनी मला दुसरे पेनकिलर दिले. खरंच या ठिकाणचे डॉक्टर खूप चांगले आहेत असे इम्रान खान बोलताना म्हणाले.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे सर्व नर्स परीप्रमाणे दिसण्यासाठी पीएम यांना केवळ एका इंजेक्शनची गरज आहे. मात्र इम्रान खान यांचा हा व्हिडीओ जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे.