केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट ! आता आसाममध्येही PM-Kisan अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार वार्षिक 6,000 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी ( PM-KISAN) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. या योजनेतून केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. सरकार हे 6,000 रुपये वर्षाला 3 हप्त्यांमध्ये देते, म्हणजेच दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात पोहोचतो. मोदी सरकारने आतापर्यंत 6 हप्त्यांत पैसे दिले आहेत. त्यानंतर आता त्याचा 7 वा हप्ता येऊ लागला आहे.

राज्यातील भूमिहीन शेतकर्‍यांना मिळणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील लोकांना जमिनी वाटपाचे पत्र वाटप करताना म्हंटले की, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल मूळ रहिवाशांच्या भूमी, भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत. पीएम मोदी यांनी शिवसागर जिल्ह्यातील जेरेंगा पठारात राहणाऱ्या भूमिहीन मूळ रहिवाशांसाठी 1.6 लाख जमीन भाडेपट्ट्यांचे वितरण केले आहे. या दरम्यान ते म्हणाले की, आता त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान किसान सन्मान निधी, क्रेडिट कार्ड आणि पीक विमा यासह इतर योजनांचा लाभ आसामच्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात पैसे
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या महसुलाची नोंद, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी करते. राज्य सरकार आपल्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविली जात नाही. राज्य सरकारच्या पडताळणीनंतर एफटीओ तयार होतो. यानंतर केंद्र सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करते.