PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे 7 हप्ते मिळाले आहे. आता 8 वा हप्ता देखील लवकरच येणार आहे. यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी त्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये तपासू शकतात. संबंधित यादी pmkisan.gov.in या पोर्टलवर अपलोड केली आहे, ज्यात कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट केली आहेत.

दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी 2018 साली पंतप्रधान किसान योजना सुरू केली. आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांच्या हप्त्यांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविली जाते. .

आतापर्यंत सुमारे 33 लाख बनावट लाभार्थी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 33 लाख बनावट लाभार्थी आढळल्यानंतर सरकारने अनेक राज्यांतील 5911788 अर्जदारांची देय रक्कम रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या अर्जदारांचे पैसे रोखले गेले आहेत त्यांची कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळले आहेत, त्यानंतर पेमेंट थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 2,326 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. आता सरकार त्यांच्याकडून वसुली करत आहे.

… तर तुम्हाला नाही मिळणार पंतप्रधान किसान योजनेचा लाभ
जर आपण पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नोंदणी केली असेल तर आपण या योजनेसाठी सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. असे शेतकरी ज्यांनी पंतप्रधान किसान योजनेंतर्गत आपल्या संस्थेच्या जमिनीची माहिती दिली आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच आपण ज्या शेतजमिनीची माहिती योजनेंतर्गत दिली आहे ती दुसर्‍याच्या नावे आहे, तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. एवढेच नव्हे जर एखादा शेतकरी शेती करतो, परंतु शेती जमीन त्याच्या नावावर नसून कुटूंबातील सदस्याच्या नावाने नसेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचबरोबर, जर एखादा शेतकरी भाड्याने जमीन घेत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 10,000 पेक्षा जास्त पेन्शन असलेले सेवानिवृत्त कर्मचारीदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच जर एखाद्या शेतकर्‍याने कोणत्याही प्रकारचे घटनात्मक पद भूषवले असेल तर तोदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीने मागील वर्षी आयकर विवरण भरला असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही.

आठव्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची :
– प्रथम शेतकरी pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.
– या वेबसाईटमध्ये ‘ Farmers Corner ‘ या पर्यायावर क्लिक करा.
-या विभागात जा आणि लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
– यानंतर, आपल्या विभागातील राज्याचे नाव, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारख्या आपल्या क्षेत्राशी संबंधित माहिती आपल्याला भरावी लागेल.
– यानंतर ‘ Get Report’ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. ज्यात आपण आपल्या हप्त्याची स्थिती पाहू शकता.

नोंदणी करण्यासाठी :
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी ऑनलाईन व ऑफलाइन करता येईल. शेतकऱ्यांना हवे असल्या ते सामान्य सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकेल, अन्यथा https://pmkisan.gov.in/ वरून ऑनलाईन नोंदणी करता येते.

– यासाठी, https: //pmkisan.gov.in/ ला भेट देऊन शेतकरी कॉर्नरवर जा.
– ‘ New Farmer Registration ‘ या पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर, आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तसेच, आपल्याला कॅप्चा कोड प्रविष्ट करुन राज्य निवडावे लागेल आणि नंतर प्रक्रिया सुरू करावी लागेल.
– आपल्यासमोर दिसणार्‍या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. तसेच बँक खात्याचा तपशील आणि शेतमालाशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.
-यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता.

हेल्पलाइनवर देखील मिळवू शकता माहिती
पीएम किसान हेल्पलाईनवरुनही शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते आणि काही अडचण आल्यास ते तक्रार नोंदवू शकतात. यासाठी 155261 हा पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय पीएम किसान टोल फ्री क्रमांक 18001155266 आणि पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक 011-23381092, 23382401 वर देखील आपण माहिती मिळवू शकता. तसेच आपण [email protected] या ई-मेल आयडी वरूनही माहिती मिळविण्यास सक्षम व्हाल.