PM Kisan : सरकारने पुढच्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना पाठवला ‘हा’ संदेश, आहे खूप फायदेशीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) च्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांना पाठवते. त्यामुळे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातात. कोरोना विषाणू महामारीच्या या गंभीर काळात शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी म्हणून सरकारने एप्रिल महिन्यातच योजनेच्या लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता पाठवला होता.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार ऑगस्टपासून लाभार्थ्यांच्या खात्यात २,००० हजार रुपयांचा पुढील हप्ता पाठवणार आहे. ऑगस्टच्या हप्त्यापूर्वी योजनेतील सर्व लाभार्थ्यांच्या मोबाइलवर एक संदेश पाठवला गेला आहे. लाभार्थ्यांच्या हितासाठी सरकारने हा संदेश पाठवला आहे. या संदेशामुळे लाभार्थ्यांच्या बर्‍याच अडचणी दूर होऊ शकतात.

सरकारकडून लाभार्थ्यांना एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. लाभार्थीं त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे जाणून घेऊ शकतात. लाभार्थी शेतकर्‍यांना पाठवलेल्या संदेशात असे लिहिले आहे- ‘प्रिय शेतकरी, आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पीएम-किसानच्या ०११-२४३००६०६ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून जाणून घेऊ शकता.’

या योजनेचा आतापर्यंत ९.५४ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. त्याचबरोबर सुमारे १.३ कोटी शेतकर्‍यांनी या योजनेत अर्ज केले आहेत, परंतु त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. असे अर्जदार आता या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून त्यांची समस्या सांगू शकतात आणि तोडगा काढू शकतात.

पीएम-किसान योजनेसंदर्भात कोणत्याही अडचणी किंवा तक्रारींसाठी शेतकरी ०१२०-६०२५१०९ या दूरध्वनी क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात. याशिवाय या योजनेशी संबंधित कोणतीही माहिती किंवा मदत मेलद्वारेही मिळू शकते. यासाठी शेतकऱ्याला [email protected] वर मेल करावा लागेल.