शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! वार्षिक 6 हजारच नव्हे तर दरमहा 3000 मिळतील, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. त्यामध्ये पीएम शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम शेतकरी मानधन योजना महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे. एखादा शेतकरी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असेल तर कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्याची नोंदणी पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल. तसेच पेन्शन योजनेसाठी तुमचे योगदान देखील सन्मान निधी योजनेच्या पैशातून कापले जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.

लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना फायदेशीर ठरत आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षात तीन वेळा दोन हजार रुपये पाठवत असते. परंतु ,जर शेतकरी कुटुंबातील कुणी आयकर भरत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या कुटूंबातील जर कोण सरकारी नोकरी करत असेल किंवा खासदार-आमदार असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पेन्शन योजनेसाठी दोन हजार ४०० रुपयांच योगदान शेतकऱ्यांना द्यावं लागेलं. त्यानंतर वयाच्या ६०व्या वर्षानंतर निवृत्तीवेतन मिळण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेमध्ये १८ ते ४० वयोगटातील कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो. साठाव्या वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळतील.पेंशन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या वयानुसार, दर महिन्याचं योगदान कमीत कमी ५५ ते जास्तीत जास्त २०० रुपये आहे. अर्थात कमीत कमी ६६० रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त दोन हजार ४०० रुपये वार्षिक भरावे लागतील.

किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) १८ वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा ५५ किंवा वर्षाकाठी ६६० रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर त्याचे वय ६० झाल्यानंतर दरमहा त्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने वयोगटानुसार किती रक्कम जमा करावी याची माहिती योजनेत दिली गेली असून आपण जेवढे पैसे जमा करणार तेवढेच पैसे सरकारही जमा करेल.