पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाली 62 हजार कोटींची मदत

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती व्यवसायाला संकटातून वाचवण्यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला होता, त्याअंतर्गत आतापर्यंत 62 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी 4.91 कोटी शेतकर्‍यांच्या पृत्येकी खात्यात दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 9 कोटी शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. या शेतकरी कुटुंबांना एकूण 18 हजार कोटींची मदत मिळणार आहे. देशात जवळपास 14.5 कोटी शेतकरी आहेत, मात्र अद्याप सर्वांची नोंदणी या योजनेअंतर्गत झालेली नाही. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. लॉकडाऊननंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी सुद्धा शेतकर्‍यांसाठी असणार्‍या आर्थिक पॅकेजसंदर्भात माहिती दिली होती. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेज अंतर्गत ही मदत करण्यात येत आहे.

ज्याअंतर्गत लॉकडाऊन दरम्यान 24 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून 9 हजार 826 कोटी एवढी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. जर तुम्हाला योजनेतंर्गत पहिल्या आठवड्यात पैसे नाही मिळाले तर लेखापाल आणि कृषि अधिकार्‍यांशी संपर्क करा. त्यातूनही तुमचे काम पूर्ण झाले नाही, तर केंद्रीय कृषि मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या 011-23381092 याठिकाणीही तुम्ही संपर्क करू शकता.