PM Kisan Maan Dhan Yojana : तुम्ही शेतकरी आहात ? 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी ‘असं’ करा फ्री रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Yojana) या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना जशी पेन्शन दिली जाते त्याप्रमाणे ही शेतकऱ्यांना दिली जाणारी पेन्शन आहे. यात वयाच्या 60 व्या वर्षानंतर पेन्शनची तरतूद आहे.

ज्या शेतकऱ्याचं वय 18 ते 40 वर्षे आहेत असा कोणताही शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतो. हा पेन्शन फंड भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) आहे.

या योजनेत वयानुसार महिन्याला पैसे भरायचे आहेत. वयाच्या 60 वर्षांनंतर महिन्याला 3000 रुपये किंवा वर्षाला 36000 रुपये पेन्शन दिली जाते. यासाठी मासिक देय 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे.

शेतकरी पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भाग घेऊ शकतात. ज्यांच्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन आहे असे शेतकरी पेन्शन योजनेत भाग घेऊ शकतता. आतापर्यंत 21 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.

या योजनेत शेतकऱ्यांना मासिक 55 रुपये किंवा 200 रुपये एवढी रक्कम किमान 20 आणि कमाल 40 वर्षे भरावी लागणार आहे. सरकारनं दिलेल्या योगदानाएवढंच शेतकऱ्यांचं योगदान असेल. म्हणजेच शेतकरी जर 55 रुपये देत असेल सरकारही त्याच्या खात्यात 55 रुपये जमा करेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला जवळच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन आपली नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि शेतीसंबंधी कागदपत्रांची प्रत घ्यावी लागेल.

शेतकऱ्याचे 2 पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुकही आवश्यक असेल. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिलं जाईल. यासाठी स्वतंत्र शुल्क नाही.

शेतकरी मासिक रक्कम किती देणार हे त्याच्या वयावर आधारीत असतं. उदा. जर 18 व्या वर्षी योजनेत सहभाग घेतला तर देय रक्कम 55 रुपये महिना किंवा वर्षाला 660 रुपये असते. जर 40 व्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर महिन्याला 200 रुपये किंवा वर्षाला 2400 रुपये देय रक्कम भरावी लागेल.

जर एखादा शेतकरी असा असेल ज्याला योजना मध्येच सोडायची आहे तर त्याचे पैसे बुडणार नाहीत. योजनेतून बाहेर पडेपर्यंत जमा झालेल्या पैशांवर बँकेच्या बचत खात्याएवढेच व्याज मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळते.