राफेल करारात मोदींनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करार सुरु असताना अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला १ हजार १२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचे वृत्त ले माँड फ्रेंच वृत्तपत्राने प्रसारित केले. वृत्त प्रसारित होताच काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल करारात पंतप्रधान मोदीं यांनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले असा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या मुद्यावरुन मोदींवर टीका करत त्यांना जेरीस आणले आहे. आता त्यात पुन्हा एकदा फ्रान्स मीडियाने अनिल अंबानी यांच्या कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान राफेल करार आणि करमाफीचा काहीही संबंध नाही असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्हींचा संबंध एकमेकांशी जोडू नये असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

तर रिलायन्स कम्युनिकेशननेही हे आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. आम्ही फ्रान्समधल्या कंपन्यांसाठीच्या नियमांचे पालन केले आहे. हा कायदा फ्रान्समधील सगळ्यांनसाठी सारखा आहे असेही रिलायन्सने म्हटले आहे. तसेच राफेल करार आणि करमाफीचा परस्पर संबंध नाही असेही स्पष्ट केले आहे.