Coronavirus : ‘कोरोना’ महामारीमुळं 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यामध्ये त्यांनी विशेष करून 60 ते 65 वर्षाच्या ज्येष्ठांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. लोकांनी लोकांसाठी केलेला कर्फ्यू म्हणजेच जनता कर्फ्यू.

दररोज 10 नवीन लोकांना आपण जनता कर्फ्यू बाबत सांगावे असे आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जनता कर्फ्यू रविवारी असणार आहे. गेल्या 2 महिन्यापासून अनेक लोक (डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी, मिडीया) रात्रं-दिवस काम करीत आहेत. लोकांना सेवा देत आहेत. कोरोना व्हायरसपासून सर्वांनी सावध राहून काळजी घ्यावी तसेच संयम बाळगावा असे आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

कोरोना ही महामारी असून तिचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्‍याची गरज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या 2 महिन्यांपासून जे दुसर्‍यांसाठी झटत आहेत त्यांना सर्वांना जनता कर्फ्यूच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता धन्यवाद द्यावा. त्यांच्या उमेद वाढविण्यासाठी त्यांना सॅल्यूट करा असेही त्यांनी सांगितले. 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक प्रशासनाने सायरन द्यावे असेही पंतप्रधानांनी सांगितले. संकटकाळी आवश्यक सेवेवर (हॉस्पीटल) दबाव वाढला नाही पाहिजे असे त्यांनी सांगितले. सर्वांनी रूटीन चेकअपसाठी हॉस्पीटलला जाण्यापासून दूर राहिले पाहिजे. रूटीन चेकअप बाबत नातेवाईक डॉक्टर किंवा फॅमिली डॉक्टरकडून फोनवरून विचारून घ्यावे.

कोरोना महामारीपासून आर्थिक नुकसान होत आहे. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड-19 टास्क फार्स गठीत करण्यात आला असून आर्थिक अडचणी सोडविणार आहे. दूध, औषधं देशात कमी पडू नयेत म्हणून केंद्र सरकार मोठी पावलं उचलत आहे असेही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. आवश्यक त्या गोष्टींचा स्टॉक करू नये असेही त्यांनी सांगितले.