Corona Vaccination : PM मोदी, सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, जाणून घ्या योजना

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झालीय. सरकारने पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांबरोबर पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात केलीय. मात्र, आता दुसर्‍या टप्प्यात राजकीय नेत्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबर इतर आजार असणार्‍या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

अनेक दिग्गज नेते हे 80 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. 80 हून अधिक वय असणार्‍या नेत्यांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील समावेश आहे. सरकारने कोरोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांत राबवली जाणार आहे, असे आधीच स्पष्ट केलंय. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या मंत्र्यांबरोबर नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील 300 हून अधिक नेते 50 पेक्षा जास्त वयाचे आहेत. तर, राज्यसभेमधील 200 हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यात भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देणार आहे. दुसरा टप्पा, मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु होईल, असे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

प्रत्येक टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी सरकारने विशेष तयारी केल्याचे सांगितले जातंय. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्याही लोकप्रितिनिधींना कोरोनाची लस दिली जाणार नाही. कोरोना लसीकरणाशी संबंधित एका अधिकार्‍याने यासंदर्भातील माहिती दिलीय. त्यांच्या हवाल्यानेच हे वृत्त दिलीय.

देशात कोरोनाची लसीकरण मोहीम सुरु होण्याच्या अगोदरच या लसीसंदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीकरणाचे नियोजन करणार्‍या राष्ट्रीय कृती दलाने देशातील 27 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सहभाग महत्वाचा असेल, असे म्हटलंय. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या नेत्याने कोरोनाची लस घेतल्यास या लसीबाबत लोकांमध्ये असणारा भ्रम दूर होऊन ते सुद्धा स्वइच्छेने कोरोना लसीकरणासाठी पुढे येतील.