15 लाख न मिळाल्यानं PM मोदी, HM शहांविरोधात फसवणुकीची ‘तक्रार’, ‘खटला’ चालणार

रांची : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला असून त्याने न्यायालायात धाव घेतली आहे. याप्रकरणाची रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयातले वकील एच.के. सिंह यांनी मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन दोघांनी देशवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 415,420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनवाणी सोमवार (दि.3) पासून जिल्हा न्यायालयात सुरु झाली आहे. मोदी आणि शहा यांनी फसवणूक केल्याचे सांगताना सिंह यांनी अमित शहांच्या सीएए कायद्यावरील विधानाचा दाखला दिला. 2019 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशवासीयांना सीएए लागू करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर सीएए लागू केल्याचे शहा सांगतात. अमित शहा सीएएचे आश्वासन पूर्ण करू शकतात तर मग जाहीरनाम्यातल्या 15 लाख रुपयांचे दिलेले वचन का पूर्ण करू शकत नाहीत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.

एच.के. सिंह पुढे म्हणाले, आश्वासनांची पूर्तता न करणं म्हणजे देशवासीयांची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शहा यांच्यासह भाजपमधील अनेक नेत्यांनी देखील देशातील जनतेची फसवणूक केली आहे. अनेक नेत्यांनी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. भाजप सीएएचे आश्वासन पूर्ण करु शकते तर मग 15 लाखांचे का नाही ? हा भाजपचा दुटप्पीपणा नाही का ? असे प्रश्न सिंह यांनी उपस्थित केले आहेत.