पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची फसवणूक केली – धनंजय मुंडे

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांचा विसर पडला आहे, हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते अंबरनाथमधील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत बोलत होते.

भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा घणाघात मुंडे यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांकडून अंबरनाथमधील विकासकामांच्या बाबतीत पूर्व आणि पश्‍चिम भाग असा भेदभाव केला जातो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यासोबत धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली.

निर्धार परिवर्तनच्या यात्रेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोप भुजबळ यांनी यावेळी केला आहे. बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करू नका, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगारांच्या मागील संपावेळी बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकच करू असे आश्‍वासन दिले होते; मात्र ते अजूनही पूर्ण करू शकलेले नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.