सरकार राम मंदिर ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरीत करणार : PM नरेंद्र मोदी

वाराणसी : वृत्तसंस्था – राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) मोठी घोषणा केली आहे. भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टकडे 67 एकर जमीनीचे हस्तांतरण करण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये सांगितले. ते वाराणसीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

मागील अनेक वर्षापासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखली जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची 67 एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहील असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच राम जन्मभूमीचा वाद संपुष्टात आला असल्याने ही जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, भारताची ओळख ही कधीही त्यावर कोणी राज्य केलं किंवा कोणी गमावलं यावर झालेली नाही. तर इथल्या लोकांची संस्कृती आणि परंपरा यांच्यामुळेच या देशाची ओळख आहे. यावेळी मोदींनी देशातील पहिल्या दिवसरात्र चालणाऱ्या ‘महाकाल एक्सप्रेस’ या खासगी रेल्वेचे उद्घाटन केले. ही रेल्वे उत्तर भारतातील वाराणसी, उज्जैन आणि ओंमकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंगांना जोडते.