PM मोदींचे आवाहन – ‘व्हॅक्सीनेशन संदर्भातील असत्य आणि अफवांना योग्य माहितीद्वारे उत्तर द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले की, भारतीय शास्त्रज्ञांनी कोविड-19 ची लस विकसित करून आपले कर्तव्य पूर्ण केले आणि आता आपल्याला असत्य तसेच अफवा पसरवणार्‍या प्रत्येक नेटवर्कला योग्य माहितीच्या आधारे पराभूत करून आपले कर्तव्य पूर्ण करायचे आहे. प्रजासत्ताक परेडमध्ये भाग घेणारे एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक आणि कलाकारांना संबोधित करताना पंतप्रधानांनी म्हटले की, अशाप्रकारच्या संघटनांनी नेहमी आव्हानाच्या काळाला तोंड देण्यासाठी आपली भूमिका निभावली पाहिजे.

ते म्हणाले, कोविडच्या काळात सुद्धा, तुम्ही केलेले कार्य कौतूकास्पद आहे. जेव्हा सरकार आणि प्रशासनाला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही स्वयंसेवी संस्थाप्रमाणे पुढे येता आणि सहाकार्य करता. पीएम मोदी म्हणाले, आरोग्य सेतु अ‍ॅप असो की, कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रसाराबाबत जागृतता करणे असो, तुमच्या द्वारे करण्यात आलेले कार्य कौतूकास्पद होते. पंतप्रधान म्हणाले, तरूणांनी लोकांना योग्य माहिती देऊन कोविड लसीकरण कार्यक्रमात मदतीसाठी आता पुढे आले पाहिजे.

लसीकरणासाठी लोकांनी पुढे यावे : पीएम मोदी
त्यांनी म्हटले, तुम्हाला आता हे पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचे आहे. तुमची पोहोच समाजाच्या सर्व भागात आहे. कोविड-19 लसीकरण कार्यक्रमासह देशाची सहायता करण्यासाठी पुढे येण्याची मी विनंती करतो. तुम्हाला लसीबाबत गरीब आणि सामान्य माणसांना योग्य माहिती द्यावी लागेल. भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसची लस विकसित करून आपले कर्तव्य पूर्ण केले आता आपल्या आपले कर्तव्य पूर्ण करायचे आहे. असत्य आणि अफवा पसरवणार्‍या नेटवर्कला आपल्याला योग्य माहितीच्या आधारे पराभूत करावे लागेल.

त्यांनी म्हटले, भारत आत्मनिर्भर होण्यासाठी तरूणांची भूमिका महत्वाची आहे. तरूणांनी कौशल्य मिळवले पाहिजे. तुम्ही हे कार्य तेव्हाच चांगल्या प्रकारे करू शकता जेव्हा तुमच्याकडे कौशल्य असेल. याचे महत्व समजूनच कौशल्य विकास मंत्रालय बनवले आहे आणि आतापर्यंत 5.5 कोटीपेक्षा जास्त तरूणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे. मोदी म्हणाले, कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उद्देश भारतातील तरूणांना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर रोजगाराच्या नव्या संधी देणे हा आहे.