डीआरडीओच्या मोहिमेची माहिती देताना पंतप्रधानांनी आचारसंहितेचा भंग केला – जयंत पाटील

मुंबई पोलीसनामा ऑनसाईन – यापूर्वी डीआरडीओचे वैज्ञानिक ज्या मोहिमा करत त्याच्या घोषणा तेच करत होते. परंतु, यावेळी पंतप्रधानांनी सॅटेलाईट पाडल्याची घोषणा केली. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे आणि तो पंतप्रधानांनी केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर लोकसभेसाठी आग्रह होता. राष्ट्रवादी काँग्रेसही त्या जागेसाठी आग्रही होती. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला असून जळगावमधील दोन जागांपैकी रावेरची जागा काँग्रेस लढवेल तर जळगावची जागा राष्ट्रवादी लढेल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

महाआघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाआघाडीचे सरकार आले पाहिजे अशी भावना लोकांच्या मनात आहे. अर्ज भरण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत आहेत. महाआघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

राम मंदिर बाजूला राहिले, भाजप कार्यालय मात्र टोलोजंग बांधले

भाजप मतदारांना पैशांची आमिष दाखवत असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. नोटाबंदीने सर्व पक्ष व भाजपमध्ये काय फरक पडला आहे हे दिसत आहे. राम मंदिर बाजूला राहिले मात्र, भाजपचे कार्यालय टोलेजंग बांधले गेले असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील आमच्यावर टीका करत आहेत. खरंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून काही अपेक्षा करणेच चुकीचे आहे, त्यांनी तर शत्रूचे सॅटेलाईट पाडल्याचा अजब शोध लावला. त्याबद्दल ते फार विद्वान आहेत. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्व पातळी सोडली आहे. आक्रस्ताळेपणाचा पंतप्रधान कधी देशाने पाहिला नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र निती फसली आहे. पंतप्रधान मोदी यामध्ये अपयशी ठरले आहेत. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात मोदी कमी का ठरले ? चीनचा पाठिंबा का मिळवता आला नाही ? नेपाळ, श्रीलंका भूतान या सर्व देशांशी चांगली परिस्थिती नाही. मग मोदींनी पाच वर्षात काय केले ? फक्त बोलायचे, करायचे काहीच नाही हे भाजपचे धोरणच. या धोरणामुळेच लोक नाराज आहेत. समाजातील प्रत्येक घटक या सरकारवर नाखुश आहेत.

आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत आम्ही उमेदवार आयात करत नाही इच्छुकांची मनधरणी करावी लागते. सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्र येवून भाजप आणि शिवसेनेचा पराभव करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला. राज्यात प्रचारासाठी फिरत असताना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देशात व राज्यात महाआघाडीचे सरकार येवू दे अशी भावना जनतेतून व्यक्त होत असल्याचेही पाटील म्हणाले.